Citizen Lab च्या संशोधकांनी एका धक्कादायक प्रकाराचा पर्दाफाश केला आहे. यात Candiru आणि Bindecy सारख्या स्पायवेअर कंपन्या डिजिटल जाहिरात प्लॅटफॉर्मचा वापर करून युजरच्या नकळत डिव्हाइसेस हॅक करत असल्याचे समोर आले आहे.
जाहिरातींचा असाही गैरवापर!
टोरंटो विद्यापीठाच्या Citizen Lab ने सायबर सुरक्षेच्या दृष्टीने एक अत्यंत गंभीर प्रकार उघडकीस आणला आहे. सरकारी संबंध असलेल्या स्पायवेअर कंपन्या आता ऑनलाइन जाहिरात नेटवर्कचा वापर करून मालवेअर पसरवत आहेत. या कटाचा मुख्य सूत्रधार म्हणून इस्रायली कंपनी 'Discover-Tech' चे नाव समोर आले आहे. Controlium नावाच्या प्लॅटफॉर्मद्वारे ही कंपनी Candiru आणि Bindecy सारख्या स्पायवेअर निर्मात्यांना जाहिरात नेटवर्कमध्ये मालिशियस कोड शिरकाव करण्यास मदत करत होती.
झिरो-क्लिक अटॅक म्हणजे काय?
हा हल्ला अत्यंत धोकादायक मानला जातो कारण यात युजरला कोणतीही लिंक क्लिक करण्याची किंवा फाइल डाऊनलोड करण्याची गरज पडत नाही. तुमच्या डिव्हाइसवर दिसणाऱ्या जाहिरातींच्या मागे असलेला हा कोड बॅकग्राउंडमध्ये काम करतो, ज्यामुळे युजरला कळण्याआधीच डिव्हाइस हॅक होते.
कोणाला टार्गेट केले जात आहे?
या हल्ल्यांचा आवाका खूप मोठा आहे. २०२४-२०२५ या काळात Al Jazeera च्या ४५ हून अधिक विंडोज सिस्टिम्सना लक्ष्य करण्यात आले होते. याव्यतिरिक्त, सैन्य दलातील अधिकारी, सायबर सुरक्षा संस्था आणि महत्त्वाची पायाभूत यंत्रणा हाताळणाऱ्या व्यक्तींचे डिव्हाइसेसही या हॅकिंगच्या रडारवर होते. Confiant या ॲड-क्वालिटी फर्मच्या सहकार्याने केलेल्या संशोधनात International Atomic Energy Agency आणि International Criminal Court सारख्या जागतिक संस्थांच्या नेटवर्कवरही संशयास्पद जाहिराती आढळल्या आहेत.
जाहिरात प्रणालीतील त्रुटींचा फायदा
ऑनलाइन जाहिरात विश्वातील 'रिअल-टाइम बिडिंग' (RTB) सिस्टिम डिझाइन करताना विशिष्ट युजर्सना टार्गेट करण्यासाठी विकसित केली गेली होती. मात्र, आता हेच फीचर हेरगिरीसाठी वापरले जात आहे. Discover-Tech ची अंतर्गत माहिती आणि सोर्स कोड उघड झाल्यामुळे, हे तंत्र इतरही सायबर गुन्हेगार वापरण्याची भीती निर्माण झाली आहे.
आता सायबर सुरक्षा तज्ज्ञांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. विशेषतः संवेदनशील माहिती हाताळणाऱ्या प्रोफेशनल्सनी 'पर्सनलाइज्ड ॲड ट्रॅकिंग' बंद करणे आणि 'ॲड-ब्लॉकिंग' टूल्सचा वापर करणे आता निव्वळ पर्याय नसून एक गरज बनली आहे.
