गृह मंत्रालयाने (Ministry of Home Affairs) एका गंभीर सायबर धोक्याबाबत इशारा दिला आहे. Night Play, Reloop, Kyss, Vimo, Rivo, Nexo आणि Vixa ही सात ॲप्स तुमची बँकिंग माहिती चोरत आहेत. ही ॲप्स चुकूनही फोनमध्ये ठेवू नका.
सायबर फसवणुकीचा नवा प्रकार
इंडियन सायबर क्राईम को-ऑर्डिनेशन सेंटरने युजर्ससाठी हाय-अलर्ट जारी केला आहे. हे स्कॅम प्रामुख्याने Facebook आणि Instagram वरील जाहिरातींमधून पसरवले जात आहे. या जाहिरातींमार्फत युजर्सना प्रलोभन दाखवून 'अडल्ट कंटेंट'च्या नावाखाली मालवेअर डाऊनलोड करायला लावले जाते. यात Night Play, Reloop, Kyss, Vimo, Rivo, Nexo आणि Vixa या ॲप्सचा समावेश आहे.
हे ॲप्स कसे काम करतात?
ही ॲप्स गुगल प्ले स्टोअरसारख्या अधिकृत स्टोअरवर उपलब्ध नाहीत. ती थेट थर्ड-पार्टी वेबसाईटवरून APK फाईल्स स्वरूपात डाऊनलोड केली जातात. एकदा इन्स्टॉल झाल्यावर, ही ॲप्स युजरकडून 'Accessibility Permission' मिळवतात. यामुळे हॅकर्सच्या हातात तुमच्या फोनचे पूर्ण नियंत्रण जाते.
बँकिंग सुरक्षिततेसाठी धोका
या परवानगीचा गैरवापर करून मालवेअर बॅकग्राउंडमध्ये राहून तुमची स्क्रीन मॉनिटर करतो. तुमच्या फोनवर येणारे OTP वाचणे किंवा बँक ॲप्समध्ये अनधिकृत व्यवहार करणे हॅकर्ससाठी सहज शक्य होते. काही प्रकरणांत, ही ॲप्स अनधिकृत VPN देखील इन्स्टॉल करतात, ज्यामुळे तुमच्या इंटरनेट ट्रॅफिकवर हॅकर्सची सतत नजर राहते.
तुम्ही काय करावे?
जर तुमच्या फोनमध्ये यापैकी कोणतेही ॲप असेल, तर ते त्वरित अनइन्स्टॉल करा. कोणत्याही संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित 1930 या सायबर क्राईम हेल्पलाईनवर संपर्क साधा किंवा cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा.
