अमेरिकेतील 'American Premier Labs' च्या मालकावर ९३ दशलक्ष डॉलर्सच्या मेडिकेअर फसवणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. आरोपीने बनावट जेनेटिक टेस्टच्या नावाखाली सरकारची मोठी फसवणूक केली असून, तो सध्या भारतात पळून गेल्याचे समोर आले आहे.
अमेरिकेतील फेडरल प्रॉसिक्युटर्सनी टेक्सासस्थित 'American Premier Labs LLC' चा मालक खादीर खान मोहम्मद याच्यावर गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. ऑगस्ट २०२३ ते ऑक्टोबर २०२४ या काळात कंपनीने मेडिकेअर (Medicare) कार्यक्रमांतर्गत तब्बल ९३ दशलक्ष डॉलर्सचे खोटे दावे सादर केले होते, ज्यापैकी किमान ६३ दशलक्ष डॉलर्स सरकारने वितरितही केले आहेत.
फसवणुकीचे जाळे
आरोपीने डॉक्टरांची परवानगी न घेता त्यांच्या ओळखीचा वापर करून जेनेटिक टेस्टसाठी बिले सादर केली. या चाचण्यांची वैद्यकीय गरज नव्हती आणि त्या प्रत्यक्षात केल्याही गेल्या नव्हत्या. ज्या रुग्णांशी या डॉक्टरांचा कोणताही संबंध नव्हता, त्यांच्या नावे ही बिले उचल्याचे निष्पन्न झाले आहे.
आरोपी भारतात फरार
अमेरिकन तपास यंत्रणांनी खादीर खानच्या बँक खात्यातून ६ दशलक्ष डॉलर्स जप्त करण्यात यश मिळवले असले तरी, आरोपी सध्या अमेरिकेतून पसार झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, तो सध्या हैदराबादमध्ये लपून बसला आहे. आता अमेरिकन यंत्रणांना आंतरराष्ट्रीय कायद्यांचा वापर करून उर्वरित ५७ दशलक्ष डॉलर्सची वसुली करण्याचे मोठे आव्हान पेलावे लागणार आहे.
डायग्नोस्टिक क्षेत्रावर सावट
ही घटना जागतिक आरोग्य सेवा आणि डायग्नोस्टिक क्षेत्रासाठी एक धोक्याची घंटा आहे. अमेरिकन सरकार आता डेटा ॲनालिटिक्सच्या माध्यमातून संशयास्पद बिलांची कसून तपासणी करत आहे. ज्या कंपन्या पारदर्शक कारभार आणि कडक ऑडिट करत नाहीत, त्यांच्यावर भविष्यात अधिक कडक कारवाई होण्याची शक्यता आहे. गुंतवणूकदारांनी हेल्थकेअर सेक्टरमधील कंपन्यांचे 'कॉम्प्लायन्स' (Compliance) तपासूनच पावले उचलणे गरजेचे झाले आहे.
