सर्वोच्च न्यायालयाने टॅक्ससंदर्भात एक महत्त्वाचा निकाल दिला आहे. आता वस्तूच्या विक्रीवेळच्या स्वरूपावरून टॅक्स ठरणार आहे, ग्राहकाने त्याचा वापर कसा केला यावरून नाही.
काय आहे नेमका वाद?
सर्वोच्च न्यायालयाने आरोग्य पूरक उत्पादने (Health Supplements) बनवणाऱ्या कंपन्यांना मोठा दिलासा दिला आहे. न्या. मनमोहन आणि न्या. अरुण पल्ली यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, वस्तूवर टॅक्स लावताना ती कोणत्या स्थितीत विकली जाते, हे महत्त्वाचे आहे. ग्राहकाने नंतर त्याचा वापर पेय बनवण्यासाठी केला किंवा अन्य कारणासाठी, यामुळे टॅक्सचे स्लॅब बदलता येणार नाहीत.
Zydus Lifesciences ला कसा फायदा?
हा वाद कंपनीच्या 'GRD Powder' आणि 'GRD Mix' उत्पादनांशी संबंधित होता. महसूल विभागाने या पावडरला 'बिगर-अल्कोहोलिक पेये' या श्रेणीत टाकून १०% टॅक्स लावण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, कंपनीने असा युक्तिवाद केला की ही पावडर स्वरूपातील वस्तू असून, ती ८% टॅक्सच्या कक्षेत यायला हवी. सर्वोच्च न्यायालयाने कंपनीचा दावा मान्य करत महसूल विभागाची अपील फेटाळून लावली आहे.
उद्योगांसाठी नवी दिशा
या निर्णयामुळे प्रोटीन पावडर, इन्स्टंट हेल्थ मिक्स आणि डिहायड्रेटेड फूड बनवणाऱ्या कंपन्यांसाठी एक भक्कम कायदेशीर आधार तयार झाला आहे. टॅक्स अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराला या निर्णयामुळे चाप बसणार असून, भविष्यात अशा प्रकारच्या कर वादांमध्ये स्पष्टता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे.
