नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने तीन वर्षांसाठी बंदी घातल्यामुळे PNC Infratech च्या शेअर्समध्ये आज २० टक्क्यांची मोठी घसरण झाली असून शेअर लोअर सर्किटला लागला आहे.
काय आहे प्रकरण?
PNC Infratech च्या शेअर्समध्ये मंगळवारी मोठी विक्री दिसून आली. कंपनीवर २०% चा लोअर सर्किट लागला असून शेअर ₹१४०.४० च्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आला आहे. नॅशनल हायवेज अथॉरिटी ऑफ इंडिया (NHAI) ने कंपनीला पुढील तीन वर्षांसाठी नवीन निविदा (Bidding) प्रक्रियेत भाग घेण्यापासून रोखले आहे. कानपुर-लखनऊ एक्सप्रेसवे पॅकेज-२ मध्ये आढळलेल्या त्रुटींमुळे ही कठोर कारवाई करण्यात आली आहे.
सध्याचे प्रोजेक्ट्स सुरक्षित?
कंपनीच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या सुरू असलेल्या प्रकल्पांच्या कामावर या बंदीचा कोणताही परिणाम होणार नाही. कंपनीचे सध्याचे कामकाज, मेंटेनन्स आणि चालू प्रकल्प नियोजित वेळेनुसार सुरू राहतील. मात्र, नवीन सरकारी कंत्राटे मिळवण्यासाठी तीन वर्षांचा ब्रेक लागणे, हे कंपनीच्या भविष्यातील वाढीसाठी मोठे आव्हान मानले जात आहे.
कंपनीचा पुढचा प्लॅन काय?
सध्या कंपनीकडे ₹१८,१०० कोटींचे अनएक्झिक्युटेड ऑर्डर बुक आहे, ज्यामुळे नजीकच्या काळात महसूल मिळणार आहे. तरीही, रस्ते बांधकामावर अवलंबून राहणे धोक्याचे असल्याने कंपनीने खाणकाम (Mining), सौर ऊर्जा आणि बॅटरी स्टोरेज अशा क्षेत्रांत ₹५,००० कोटींच्या प्रकल्पांवर भर देण्यास सुरुवात केली आहे. आता हे पर्यायी मार्ग कंपनीला किती सावरतात, यावर गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. कंपनी या निर्णयाला कायदेशीर आव्हान देण्याचा विचार करत आहे.
