१ नोव्हेंबर २०२६ पासून कर्नाटक सरकारने रुग्णालयांसाठी नवीन नियम लागू केला आहे. आता प्रत्येक हॉस्पिटलला औषधे आणि वैद्यकीय साहित्याच्या खरेदीची किंमत, MRP आणि रुग्णांकडून आकारलेली अंतिम किंमत बिलावर स्पष्टपणे नमूद करावी लागणार आहे.
कर्नाटक फूड सेफ्टी अँड ड्रग्स ॲडमिनिस्ट्रेशनने खाजगी, सार्वजनिक आणि ट्रस्ट-संचलित सर्व रुग्णालयांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या नवीन नियमांमुळे रुग्णालयांना आता औषधे आणि उपभोग्य वस्तूंच्या खरेदीची किंमत (Landing Cost), एमआरपी (MRP) आणि रुग्णांना लावलेली अंतिम किंमत ही माहिती बिलावर देणे बंधनकारक असेल. औषधांच्या किमतींवर आकारले जाणारे अवाढव्य मार्जिन रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
हॉस्पिटलच्या कमाईवर परिणाम
गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब म्हणजे हॉस्पिटल चेनच्या नफ्यावर (Profit Margins) होणारा परिणाम. अनेक हॉस्पिटल्सची कमाई ही औषधे आणि इतर महागड्या साहित्यावरील मार्जिनवर अवलंबून असते. या नवीन नियमांमुळे किमतींमध्ये समानता आणण्याचा दबाव वाढणार आहे, ज्याचा थेट परिणाम आगामी तिमाही निकालांवर दिसून येऊ शकतो.
क्षेत्रातील हालचाली आणि सरकारी भूमिका
कर्नाटक सरकारचा हा निर्णय केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पारदर्शकतेच्या मोहिमेचा भाग आहे. यापूर्वी सर्वोच्च न्यायालयानेही वैद्यकीय साहित्याच्या किमती आणि रुग्णांकडून आकारली जाणारी रक्कम यातील तफावतीवर नाराजी व्यक्त केली होती. याचा फटका Apollo Hospitals, Max Healthcare आणि KIMS यांसारख्या मोठ्या हॉस्पिटल शेअर्सवर पडण्याची शक्यता आहे. याआधीही अशा प्रकारच्या नियमांमुळे मार्केटमध्ये या क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी अस्थिरता (Volatility) पाहायला मिळाली होती.
ऑपरेशनल आव्हाने
फक्त किमती उघड करणे एवढेच नाही, तर हॉस्पिटल्सना आता ३ वर्षांपर्यंत खरेदीच्या पावत्या आणि बिलिंग रेकॉर्ड सांभाळून ठेवावे लागणार आहेत. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली हे ऑडिट केले जाईल. नियमांचे पालन न केल्यास कठोर दंडात्मक कारवाई होऊ शकते. हॉस्पिटल चेनना आता त्यांच्या बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये मोठे बदल करावे लागतील, ज्याचा अतिरिक्त आर्थिक भार त्यांच्यावर पडणार आहे.
