USCIS ने EB-5 व्हिसा अर्जाच्या शुल्कात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेतला असून, ३० नोव्हेंबरपासून हे नवे दर लागू होतील. यामुळे अमेरिकन ग्रीन कार्डसाठी प्रयत्न करणाऱ्या भारतीय गुंतवणूकदारांच्या खिशावर अधिक ताण पडणार आहे.
अमेरिकेच्या युनायटेड स्टेट्स सिटीझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेस (USCIS) ने EB-5 इमिग्रंट इन्व्हेस्टर प्रोग्रामच्या फी संरचनेत मोठा बदल केला आहे. ३० नोव्हेंबरपासून या व्हिसासाठी अर्ज करणे आता अधिक खर्चीक होणार असून, अनेक प्रक्रियांचे शुल्क दुपटीने वाढवण्यात आले आहे.
अर्जाचे नवीन दर
- Form I-526: स्वतंत्र गुंतवणूकदारांसाठी हे शुल्क आता $३,६७५ वरून $७,६१५ करण्यात आले आहे.
- तंत्रज्ञान अधिभार (Technology Surcharge): प्रत्येक अर्जावर आता $७५ अतिरिक्त फी अनिवार्य करण्यात आली आहे, जी डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि फ्रॉड डिटेक्शनसाठी वापरली जाईल.
- प्रादेशिक केंद्रे (Regional Centers): प्रादेशिक केंद्रांच्या नोंदणीसाठी लागणारे Form I-956 चे शुल्क $१७,७९५ वरून थेट $४४,११५ पर्यंत वाढवण्यात आले आहे. तसेच, व्यावसायिक गुंतवणुकीसाठी (Form I-956F) आता $४२,६७५ मोजावे लागतील.
भारतीय गुंतवणूकदारांवर परिणाम
गुंतवणुकीची मूळ रक्कम (Targeted Employment Areas साठी $८,००,००० आणि इतर प्रकल्पांसाठी $१०.५ लाख) स्थिर असली, तरी प्रशासकीय खर्चात झालेली ही वाढ गुंतवणूकदारांसाठी चिंतेची बाब आहे. या योजनेत आधीच प्रदीर्घ वेटिंग लिस्ट आणि वार्षिक कोटा यांसारखी आव्हाने असताना, आता वाढीव फीमुळे अमेरिकेत स्थायिक होण्याचा मार्ग अधिक महाग झाला आहे. आता गुंतवणूकदारांचे लक्ष केवळ शुल्कावर नसून, या बदल्यात USCIS कडून प्रोसेसिंगचा वेग वाढतो का, याकडे लागले आहे.
