PIB चा 'AI स्कॅम' बाबत गंभीर इशारा
केंद्र सरकारच्या PIB (Press Information Bureau) ने नागरिकांना एका नवीन ऑनलाइन फसवणुकीपासून सावध केले आहे. सोशल मीडियावर एक बनावट व्हिडिओ वेगाने पसरत आहे, ज्यामध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एका हाय-रिटर्न इन्व्हेस्टमेंट स्कीमचे (High-Return Investment Scheme) समर्थन करताना दिसत आहेत. PIB ने स्पष्ट केले आहे की हा व्हिडिओ पूर्णपणे खोटा असून, याचा अर्थमंत्री किंवा भारत सरकारशी कोणताही संबंध नाही.
आठवड्याला लाखो रुपयांच्या परताव्याचे खोटे दावे
या बनावट व्हिडिओमध्ये असा दावा केला जात आहे की, केवळ ₹22,000 गुंतवून लोक दर आठवड्याला ₹5.5 लाख कमवू शकतात. AI (Artificial Intelligence) तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थमंत्र्यांसारखा आवाज तयार केला गेला आहे. हा व्हिडिओ लोकांना आमिष दाखवण्यासाठी आणि त्यांची फसवणूक करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.
PIB ने दिली जनतेला ताकीद
PIB ने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे की, अर्थमंत्र्यांनी किंवा सरकारने अशा कोणत्याही गुंतवणूक प्लॅटफॉर्मला मान्यता दिलेली नाही. नागरिकांनी कोणत्याही गुंतवणुकीच्या दाव्यांची पडताळणी अधिकृत स्त्रोतांकडूनच करावी, असे आवाहन PIB ने केले आहे. तसेच, बनावट व्हिडिओ आणि फसव्या योजनांची माहिती तात्काळ कळवण्याची विनंती केली आहे. AI चा वापर अशा चुकीच्या माहितीसाठी वाढत असल्याबद्दलही PIB ने चिंता व्यक्त केली आहे.