मुख्य आर्थिक सल्लागार (CEA) V. Anantha Nageswaran यांनी अमेरिकेसोबतचे अस्थिर व्यापारी संबंध, वाढती ऊर्जा महागाई आणि AI क्षेत्रातील भारताची पिछाडी यावर भाष्य केले आहे. अल्पकालीन अनिश्चितता असली तरी भारताचे आर्थिक भवितव्य भक्कम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
व्यापारातील 'अस्वस्थता'
मुख्य आर्थिक सल्लागार V. Anantha Nageswaran यांनी मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना भारताच्या अर्थव्यवस्थेपुढील आगामी आव्हानांवर प्रकाश टाकला. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापाराचे सध्याचे स्वरूप हे 'अस्वस्थ संतुलन' (Uneasy Equilibrium) असल्याचे त्यांनी म्हटले आहे. विशेषतः टॅरिफवरून सुरू असलेले वाद आणि रशियन तेलाच्या खरेदीवरून अमेरिकेच्या धोरणांमुळे निर्माण होणारी अनिश्चितता ही एफआयआय (FII) गुंतवणूक आणि चलनासाठी चिंतेची बाब ठरू शकते.
लॉजिस्टिक्स आणि उर्जेचे संकट
केवळ व्यापारच नाही, तर देशांतर्गत अर्थव्यवस्थेवरही लॉजिस्टिक्स आणि वाढत्या ऊर्जा खर्चाचा ताण आहे. शिपिंगचे वाढते दर आणि नैसर्गिक वायू तसेच खतांच्या किमतीतील अस्थिरता भारतीय निर्यातीला आव्हान देत आहे. या महागाईचा फटका भारतीय उत्पादनांच्या जागतिक स्पर्धेवर बसण्याची शक्यता आहे.
'AI गॅप' हा शाप की वरदान?
जागतिक बाजारपेठेत सध्या एआय (AI) इन्फ्रास्ट्रक्चर आणि हार्डवेअरमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे, मात्र भारत या शर्यतीत मागे आहे. याकडे नागेश्वरन यांनी एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. सध्याचे जागतिक एआय इन्व्हेस्टमेंट हे कर्ज आणि सट्टेबाजीवर आधारित असल्याचे त्यांनी नमूद केले. जर भविष्यात यात करेक्शन आले, तर जागतिक गुंतवणूकदार सुरक्षित आणि स्थिर ग्रोथ असलेल्या भारतासारख्या देशांकडे वळतील, असे त्यांनी सांगितले.
भारताची ताकद काय?
अल्पकालीन आव्हाने असली तरी भारताची मॅक्रो फंडामेंटल्स मजबूत आहेत. विकसित देशांच्या तुलनेत भारताचे डेट-टू-जीडीपी (Debt-to-GDP) प्रमाण अधिक स्थिर आहे, जे गुंतवणूकदारांसाठी मोठा दिलासा आहे.
