दुबईहून तेल अवीवकडे जाणारे Flydubai चे विमान तातडीने सौदी अरेबियातील तबुक येथे उतरवण्यात आले आहे. विमानाच्या कॉकपिटमध्ये दोन वैमानिकांमध्ये झालेल्या हाणामारीमुळे हे गंभीर संकट ओढवले.
दुबई ते तेल अवीव प्रवास करणाऱ्या Flydubai च्या FZ1073 या विमानामध्ये एक धक्कादायक घटना घडली. प्रवास सुरू झाल्यानंतर सुमारे दोन तासांनी विमानाच्या कॉकपिटमध्ये कॅप्टन स्मित मच्छार आणि त्यांच्या सह-वैमानिकांमध्ये अचानक वाद झाला, ज्याचे रूपांतर शारीरिक झटापटीत झाले.
या संकटामुळे Boeing 737 MAX 8 हे विमान ३४,००० फूट उंचीवरून अचानक १६,००० फुटांवर खाली उतरवण्यात आले. सुरक्षिततेच्या दृष्टीने वैमानिकांनी ७७०० आणि ७५०० (बेकायदेशीर हस्तक्षेप) हे आपत्कालीन कोड एअर ट्रॅफिक कंट्रोलला पाठवले. या सिग्नलमुळे परिसरात तातडीने लढाऊ विमाने तैनात करण्यात आली होती.
भारतीय वंशाचे आणि SpiceJet चे माजी पायलट असलेले कॅप्टन स्मित मच्छार हे या झटापटीत जखमी झाले, तरीही त्यांनी प्रसंगावधान राखत विमानाचे नियंत्रण स्वतःकडे ठेवले आणि सौदी अरेबियातील तबुक विमानतळावर ते सुखरूप उतरवले. विमानातील १७४ प्रवासी सुरक्षित असून, दोन्ही वैमानिकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सध्या सौदी अरेबिया आणि इस्रायलच्या विमान वाहतूक प्राधिकरणांकडून या घटनेची सखोल चौकशी सुरू आहे. A6-FKF नोंदणीकृत असलेले हे विमान सध्या तबुकमध्येच थांबवण्यात आले असून, तांत्रिक तपासणी सुरू आहे. या घटनेमुळे जागतिक विमान वाहतूक क्षेत्रात पायलट ट्रेनिंग आणि कॉकपिट सुरक्षेबाबत पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
