शेअर बाजारातील एक्स्पायरी डे च्या दिवशी होणारी मोठी पडझड किंवा चढ-उतार रोखण्यासाठी SEBI ने कंबर कसली आहे. डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंटसाठी आता 'कॅश मार्केट क्लोजिंग प्राईस' ऐवजी VWAP पद्धत वापरण्याचा विचार केला जात आहे.
भारतीय शेअर बाजारातील नियामक संस्था SEBI ने डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्सच्या सेटलमेंट प्रक्रियेत आमूलाग्र बदल सुचवले आहेत. सध्या एक्स्पायरीच्या दिवशी सेटलमेंटची किंमत ही कॅश मार्केटच्या क्लोजिंग प्राईसवर अवलंबून असते. यामुळे शेवटच्या काही मिनिटांत बाजारात मोठी उलथापालथ पाहायला मिळते. ही अनिश्चितता कमी करण्यासाठी आता एक नवीन आणि स्थिर सेटलमेंट फ्रेमवर्क आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
VWAP पद्धतीचा फायदा काय?
SEBI आता 'व्हॉल्यूम वेटेड एव्हरेज प्राईस' (VWAP) या पद्धतीचा विचार करत आहे. यामध्ये केवळ शेवटची किंमत न घेता, दिवसभरातील ट्रेड झालेला व्हॉल्यूम आणि किंमत यांचा विचार केला जातो. यामुळे शेवटच्या काही मिनिटांत होणाऱ्या मोजक्या सौद्यांमुळे किमतीत होणारे फेरफार थांबण्यास मदत होईल.
SEBI कडून दोन पर्याय सादर
१. ब्लेंडेड VWAP: यामध्ये शेवटच्या ३० मिनिटांचा ट्रेड आणि १० मिनिटांच्या क्लोजिंग ऑक्शन सत्रातील डेटाचा समावेश असेल.
२. लास्ट ३० मिनिट्स VWAP: यामध्ये फक्त नियमित ट्रेडिंगच्या शेवटच्या ३० मिनिटांच्या व्यवहारांचा विचार केला जाईल.
इतर महत्त्वाचे नियम
- क्लोजिंग ऑक्शन सत्रात इंडिकेटिव्ह इंडेक्स व्हॅल्यूचे डिस्प्ले बंद करण्याचा प्रस्ताव आहे, ज्यामुळे शेवटच्या क्षणी होणारे स्पेक्लेशन कमी होईल.
- सध्याच्या १ टक्क्यांच्या प्राईस बँडच्या बाहेर पडणाऱ्या ऑर्डर्सवर अधिक कडक निर्बंध लादले जाणार आहेत.
हा बदल अंमलात आल्यास एक्स्पायरीच्या दिवशी होणारी बाजारातील धावपळ कमी होईल आणि सामान्य गुंतवणूकदारांना अधिक पारदर्शक वातावरण मिळेल. आता केवळ SEBI च्या अंतिम परिपत्रकाची प्रतीक्षा आहे.
