संवत २०८३ साठी मुहुरत ट्रेडिंगची तारीख आणि वेळ निश्चित झाली आहे. ८ नोव्हेंबर २०२६ रोजी दुपारी २:२० ते ३:३० या वेळेत मार्केट खुले राहणार असून, १०-११% च्या करेक्शननंतर गुंतवणूकदारांच्या नजरा आता नवीन वर्षातील रिकव्हरीवर आहेत.
भारतीय शेअर बाजारात संवत २०८३ च्या स्वागतासाठी ८ नोव्हेंबर २०२६ रोजी विशेष मुहुरत ट्रेडिंग पार पडणार आहे. दुपारी २:०५ ते २:२० या वेळेत प्री-ओपनिंग सेशन होईल, तर मुख्य ट्रेडिंग सेशन २:२० ते ३:३० वाजेपर्यंत सुरू राहील.
संवत २०८२ चा चढ-उतार
गेले वर्ष शेअर बाजारासाठी अत्यंत आव्हानात्मक ठरले आहे. निफ्टी ५० (Nifty 50) आणि बीएसई सेन्सेक्स (BSE Sensex) मध्ये सुमारे १०-११% पर्यंत घसरण पाहायला मिळाली. भौगोलिक तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांची (FIIs) मोठी विक्री यामुळे गुंतवणूकदारांना फटका बसला.
संवत २०८३ चे आउटलुक
नवीन वर्षात मार्केटची स्थिती सुधारण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मुख्य लक्ष आता कंपन्यांच्या कमाईवर (Earnings) असेल. विशेष म्हणजे, ८ व्या वेतन आयोगाच्या (8th Pay Commission) अंमलबजावणीच्या चर्चांमुळे ऑटोमोबाईल, बँकिंग (BFSI) आणि कन्झ्युमर ड्युरेबल्स क्षेत्रांत मागणी वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, पायाभूत सुविधांवरील सरकारी खर्चाचा फायदाही अनेक कंपन्यांना मिळण्याची आशा आहे.
जोखमीचे घटक
बाजारात सकारात्मक वातावरण असले तरी, काही धोके अजूनही कायम आहेत. कच्च्या तेलाच्या किमतीत होणारी वाढ आणि FII चा ओघ मर्यादित राहणे या गोष्टींचा परिणाम इंडेक्सवर होऊ शकतो. मुहुरत ट्रेडिंग हे केवळ एक शुभ मुहूर्त मानले जाते, मात्र वर्षभराची दिशा ही महागाई, व्याजाचे दर आणि कंपन्यांच्या तिमाही निकालांवरच अवलंबून असेल.
