नवीन नियमांनुसार काय स्पष्ट झाले?
नवीन आयकर कायदा २०२५ (Income Tax Act 2025) १ एप्रिलपासून लागू होत असून, या कायद्यात बांधकाम सुरु असलेल्या घरांवरील होम लोनवरील व्याजाच्या कराबाबत (Tax) काहीशी संदिग्धता होती. मात्र, आता Budget 2026 मध्ये यावर स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या नवीन स्पष्टीकरणानुसार, 'पूर्व-कालावधी व्याज' (Prior-period interest) म्हणून ओळखले जाणारे हे व्याज, मालमत्तेवरील उत्पन्नातून (House Property Income) वजावट म्हणून दावा करण्यास पात्र ठरेल. हे जुन्या आयकर कायदा १९६१ (Income Tax Act 1961) नुसार असलेल्या तरतुदींचेच प्रतिबिंब आहे.
जुनी डिडक्शनची पद्धत कायम
सध्याच्या नियमांनुसार, घरमालक मालमत्ता पूर्ण होण्यापूर्वी किंवा ताब्यात घेण्यापूर्वी भरलेल्या व्याजावर डिडक्शन (Deduction) घेऊ शकतात. ही डिडक्शन साधारणपणे मालमत्ता ताब्यात घेतल्याच्या किंवा बांधकाम पूर्ण झाल्याच्या वर्षापासून सुरू होणाऱ्या पाच समान वार्षिक हप्त्यांमध्ये (Installments) विभागली जाते. स्वतःच्या राहण्याच्या घरांसाठी (Self-occupied properties) वार्षिक ₹2 लाख पर्यंतची कमाल मर्यादा आहे, तर भाड्याने दिलेल्या घरांसाठी (Let-out properties) अशी कोणतीही मर्यादा नाही. या स्पष्टीकरणामुळे, विशेषतः मोठ्या शहरांमध्ये बांधकाम सुरु असलेल्या घरांमध्ये बुकिंग केलेल्या हजारो कुटुंबांना दिलासा मिळाला आहे.
तज्ज्ञांचे मत: धोके कायम
जरी या स्पष्टीकरणामुळे करदात्यांच्या चिंता कमी झाल्या असल्या आणि व्याजाच्या कराबाबतच्या संदिग्धता दूर झाल्या असल्या तरी, तज्ज्ञांच्या मते यात कोणताही नवीन किंवा वाढीव कर लाभ (Tax Benefit) मिळत नाहीये. 'मनोहर चौधरी अँड असोसिएट्स'चे भागीदार अमीत पटेल यांनी सांगितले की, हा प्रस्ताव केवळ जुन्या प्रथेला कायम ठेवत आहे, कोणतीही अतिरिक्त सवलत देत नाहीये. चार्टर्ड अकाउंटंट हिनेश दोषी यांनी यातील मुख्य समस्या कायम असल्याचे निदर्शनास आणले आहे. ते म्हणाले की, कर्जदारांना मालमत्ता ताब्यात मिळण्यापूर्वी अनेक वर्षे व्याज भरावे लागते, परंतु कराचा फायदा मिळायला उशीर होतो. प्रकल्पांना उशीर होणे किंवा ते पूर्ण न झाल्यास, करदात्यांना त्यांचे कर लाभ पूर्णपणे गमवावे लागण्याचा धोका आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, व्याज भरल्या त्याच आर्थिक वर्षात (Year-of-incurrence) डिडक्शनचा पर्याय उपलब्ध करून दिल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल.