नोकरी किंवा शिक्षणासाठी परदेशी जात असाल, तर तुमचे NPS खाते बंद करण्याची गरज नाही. मात्र, नियमांनुसार तुम्हाला तुमचे KYC अपडेट करणे आणि सर्व व्यवहार NRE किंवा NRO बँक खात्यातून करणे अनिवार्य आहे.
जर तुम्ही परदेशात स्थायिक होत असाल, तर तुमचे नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS) खाते बंद करण्याची अजिबात गरज नाही. भारतीय नागरिक जे आता NRI (Non-Resident Indian) झाले आहेत, ते परदेशात असतानाही त्यांचे Tier-I खाते सुरू ठेवू शकतात. मात्र, या स्थिती बदलामुळे तुम्हाला काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे, जेणेकरून भविष्यात पेन्शन काढताना कोणतीही अडचण येणार नाही.
बँकिंग आणि KYC नियमावली
परदेशी जाताना सर्वात पहिली पायरी म्हणजे तुमच्या Central Recordkeeping Agency (CRA) कडे तुमचा रहिवासी दर्जा (Residential Status) आणि KYC डिटेल्स अपडेट करणे. RBI आणि FEMA च्या नियमांनुसार, एकदा तुम्ही NRI झालात की, तुम्ही तुमच्या नियमित बचत खात्यातून (Resident Savings Account) NPS मध्ये गुंतवणूक करू शकत नाही. आता तुम्हाला सर्व व्यवहार हे केवळ NRE (Non-Resident External) किंवा NRO (Non-Resident Ordinary) बँक खात्यातूनच करणे बंधनकारक आहे. जर तुम्ही हे बदल केले नाहीत, तर भविष्यात विथड्रॉल करताना समस्या उद्भवू शकतात.
तसेच, लक्षात ठेवा की NRI साठी Tier-II खाते उपलब्ध नसते. जर तुमचे कॉर्पोरेट NPS खाते असेल, तर तुम्ही ते 'ऑल सिटीझन्स' मॉडेलमध्ये ट्रान्सफर करू शकता.
आंतरराष्ट्रीय टॅक्सचे गणित
भारतात NPS टॅक्ससाठी फायदेशीर असले तरी, ज्या देशात तुम्ही राहणार आहात, तिथले टॅक्स नियम पूर्णपणे वेगळे असू शकतात. भारतातील ६० टक्के लम्प-सम विथड्रॉल करमुक्त असले, तरी अनेक परदेशी देश या सवलतीला मान्यता देत नाहीत. अशा देशांमध्ये तुमच्या NPS कॉर्पसवरील वार्षिक वाढीवरही तुम्हाला टॅक्स भरावा लागू शकतो.
यासाठी भारत आणि संबंधित देशांमधील Double Taxation Avoidance Agreement (DTAA) तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी दोन्ही देशांतील टॅक्स नियमांची माहिती असलेल्या सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. लक्षात ठेवा, जर तुम्ही भारताचे नागरिकत्व सोडले, तर तुमचे NPS खाते आपोआप बंद होईल.
