अनेक रिटेल ट्रेडर्स शेअर बाजारात, विशेषतः F&O मध्ये कर्ज घेऊन ट्रेडिंग करण्याची चूक करतात. जर तुम्हीही अशा कर्जबाजारीपणात अडकला असाल, तर तातडीने सावध होऊन ही पावले उचलणे गरजेचे आहे.
बाजारात ट्रेडिंग करण्यासाठी उसने पैसे किंवा कर्ज घेणे, हा सर्वात मोठा आर्थिक धोका आहे. अनेकदा गुंतवणूकदार F&O सेगमेंटमधील आपले नुकसान भरून काढण्यासाठी पर्सनल लोन किंवा क्रेडिट कार्डचा वापर करतात. यालाच 'रिव्हेंज ट्रेडिंग' (Revenge Trading) म्हणतात, ज्यामुळे तोटा भरून निघण्याऐवजी कर्जाचा डोंगर वाढत जातो.
F&O ट्रेडिंगचे वास्तव
SEBI च्या आकडेवारीनुसार, F&O मार्केटमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या बहुतांश रिटेल गुंतवणूकदारांना निव्वळ नफा मिळत नाही. जेव्हा तुम्ही स्वतःच्या भांडवलावर ट्रेड करता, तेव्हा नुकसान मर्यादित असते. मात्र, जेव्हा तेच नुकसान कर्जाच्या पैशातून भरून काढण्याचा प्रयत्न केला जातो, तेव्हा त्यावरचे १५% ते ३५% व्याज तुमच्यावर मोठा बोजा टाकते.
कर्जाचा धोका का आहे?
क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जाचे व्याजदर अत्यंत जास्त असतात. शेअर बाजार हा अनिश्चित आहे, पण कर्जाचे हप्ते (EMI) निश्चित असतात. बाजारात तुमचा ट्रेड यशस्वी होईलच याची शाश्वती नसते, त्यामुळे उसन्या पैशांनी ट्रेडिंग करणे हे जुगारासारखेच आहे.
कर्जमुक्तीसाठी काय करावे?
- ट्रेडिंग त्वरित थांबवा: सर्वात आधी आपली speculative ट्रेडिंग बंद करा. एका मोठ्या ट्रेड्सने सर्व प्रश्न सुटतील, हा भ्रम मनातून काढून टाका.
- कर्जाचा हिशोब करा: सर्व कर्जांची यादी करा आणि व्याजाचे दर तपासा. स्वतःची आर्थिक स्थिती प्रामाणिकपणे तपासा.
- संवाद साधा: लेंडर्सशी (बँका किंवा सावकार) संवाद साधा. शक्य असल्यास कर्ज पुनर्रचना (Restructuring) करण्याची विनंती करा. दुर्लक्ष केल्याने व्याजाचा बोजा वाढत जाईल.
- प्राधान्यक्रम ठरवा: कर्जाची परतफेड करण्याआधी तुमचे मूलभूत खर्च (घरभाडे, अन्न, आपत्कालीन निधी) सांभाळणे महत्त्वाचे आहे.
लक्षात ठेवा, आर्थिक स्थैर्य मिळवणे हे मार्केटमध्ये पुन्हा विजय मिळवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचे आहे. आता तुमचे लक्ष्य केवळ कर्ज फेडण्यावर आणि स्वतःच्या आर्थिक स्थितीला पुन्हा रुळावर आणण्यावर असायला हवे.
