जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी आता सुरक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी नवी शक्कल लढवत आहेत. हे दहशतवादी पॉर्न वेबसाईट आणि एन्क्रिप्टेड ॲप्सचा वापर करून एकमेकांशी संपर्क साधत असल्याचे गुप्तचर अहवालातून समोर आले आहे.
काश्मीरमध्ये सक्रीय असलेल्या दहशतवादी संघटनांच्या कार्यपद्धतीत मोठा बदल दिसून येत आहे. व्हॉट्सॲप (WhatsApp) आणि सिग्नल (Signal) सारख्या प्लॅटफॉर्मवर सुरक्षा यंत्रणांची करडी नजर असल्याने, आता हे दहशतवादी अधिक गुंतागुंतीच्या आणि सामान्य न वाटणाऱ्या डिजिटल मार्गांचा वापर करत आहेत.
पॉर्न साईट्सचा मुखवटा
तपासणीत असे समोर आले आहे की, दहशतवादी आता अशा पॉर्न वेबसाईटचा वापर करत आहेत जिथे लाईव्ह-चॅटची सुविधा उपलब्ध आहे. या साईट्सवरील ट्रॅफिक खूप जास्त असल्याने, ते आपल्या संशयास्पद सूचना सामान्य संवादाच्या नावाखाली लपवून पाठवतात. यामुळे सुरक्षा यंत्रणांना या ट्रॅफिकमधून घातक संदेश वेगळे करणे कठीण जात आहे.
'ऑफ-ग्रिड' तंत्रज्ञानाचा वापर
केवळ वेबसाईटच नाही, तर आता हे दहशतवादी 'Tor' नेटवर्कचा वापर करत आहेत, ज्यामुळे त्यांचा डेटा ट्रॅक करणे कठीण होते. याव्यतिरिक्त, Conion आणि Coatex सारख्या अशा ॲप्सचा वापर केला जात आहे, ज्यासाठी फोन नंबर किंवा ईमेल आयडीची गरज नसते. हे ॲप्स अगदी 2G नेटवर्कवरही चालतात, ज्यामुळे दुर्गम भागातही त्यांचा संपर्क कायम राहतो.
आभासी सिम कार्ड्स (Virtual SIMs) चे आव्हान
सुरक्षा दलांपुढील आणखी एक मोठे आव्हान म्हणजे 'व्हर्च्युअल सिम कार्ड्स'. या सिम कार्डचा कोणताही फिजिकल पुरावा किंवा डिजिटल फूटप्रिंट नसतो. २०१९ च्या पुलवामा हल्ल्याच्या तपासातही अशाच प्रकारे व्हर्च्युअल सिमचा वापर झाल्याचे स्पष्ट झाले होते. आता सुरक्षा यंत्रणा आपली सर्विलन्स सिस्टिम अधिक सक्षम करण्यासाठी काम करत आहेत जेणेकरून या नवीन डिजिटल क्लृप्त्यांना वेळीच रोखता येईल.
