Maharashtra Public Service Commission (MPSC) ने ड्रग्ज इन्स्पेक्टर (Group-B) पदाची भरती परीक्षा पेपर फुटीच्या प्रकरणामुळे रद्द केली आहे. मुंबई क्राईम ब्रांचने या प्रकरणात सहा जणांना अटक केली असून, यात आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.
राज्य सेवा आयोगाच्या (MPSC) ड्रग्ज इन्स्पेक्टर पदाच्या भरती प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. मुंबई क्राईम ब्रांचने केलेल्या तपासात पेपरफुटीचे गंभीर धागेदोरे सापडल्यानंतर ही संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात आयोगाचे अतिरिक्त सचिव अभिजीत लेंडे यांच्यासह तीन सरकारी कर्मचारी आणि इतर अशा एकूण सहा जणांना अटक करण्यात आली आहे.
नक्की काय घडले?
तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, परीक्षेच्या आधीच २९४ गोपनीय प्रश्न फोडण्यात आले होते. कोचिंग सेंटर चालवणाऱ्यांनी हे प्रश्न प्रत्येक उमेदवाराला ५ लाख रुपये घेऊन विकल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, ही परीक्षा मुलाखतीच्या टप्प्यापर्यंत पोहोचली होती. आतापर्यंत ४८८ उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या होत्या, मात्र या अनियमिततेमुळे संपूर्ण मेरिट लिस्टच रद्द करावी लागली आहे.
उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी
ज्या हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी मेहनत घेतली होती, त्यांना आता पुन्हा परीक्षा द्यावी लागणार आहे. मात्र, आयोगाने स्पष्ट केले आहे की, पुन्हा परीक्षा देण्यासाठी उमेदवारांना कोणतीही नवीन फी भरावी लागणार नाही किंवा पुन्हा नोंदणी करावी लागणार नाही. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून, अटकेतील आरोपींच्या कॉल रेकॉर्ड्सवरून आणखी काही बडे मासे गळाला लागण्याची शक्यता आहे. नवीन परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेले नाही.
