कोलकाताच्या न्यू टाऊन परिसरात झालेल्या बॉम्बस्फोटात एक जण जखमी झाला असून इमारतीचेही नुकसान झाले आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) घटनास्थळाची पाहणी करत आहे, तर स्थानिक पोलीस दोघांना ताब्यात घेऊन चौकशी करत आहेत.
कोलकाता हादरले!
कोलकाताच्या न्यू टाऊन भागातील दक्षिण नारायणपूर परिसरात एका निवासी इमारतीत शुक्रवारी संध्याकाळी एक धक्कादायक घटना घडली. येथे एक कमी तीव्रतेचा बॉम्ब (Crude Bomb)स्फोट झाला. या घटनेत एक व्यक्ती जखमी झाली असून इमारतीचेही नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि राज्य सुरक्षा दलांनी तातडीने तपास सुरू केला.
काय आहे प्रकरण?
स्थानिक पोलिसांनी केलेल्या तपासात md शमिम उर्फ सलीम नावाचा मुख्य संशयित समोर आला आहे. इमारतीचे मालक झुल्फिकार अन्सारी यांच्या जबाबावरून, सलीम नावाच्या व्यक्तीला एका ब्रोकरमार्फत (Shahenshah) भाड्याने खोली घेण्यासाठी पाठवण्यात आले होते. स्फोटापूर्वी संशयित व्यक्तीने ग्राउंड फ्लोअरवरील खोलीत एक बॅग ठेवली होती, असे तपासात उघड झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ब्रोकरसह आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली आहे.
NIA ची एन्ट्री
या घटनेची दखल राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) घेतली आहे. NIA ने स्वतःहून या प्रकरणाची नोंद घेतली असून, तपास करण्यासाठी एक टीम घटनास्थळी पाठवली आहे. NIA चे अधिकारी सध्या पुरावे गोळा करत असून, स्थानिक रहिवाशांशी बोलून स्फोटाचे स्वरूप तपासत आहेत. या स्फोटाबाबत एक प्राथमिक अहवाल केंद्रीय गृह मंत्रालयाला सादर केला जाईल. या अहवालाच्या आधारावर NIA पुढील कारवाई करणार की नाही, याचा निर्णय घेतला जाईल.
स्फोटातून काय सापडले?
घटनास्थळी केलेल्या तपासणीत CID आणि बॉम्ब शोधक पथकाने दोन जिवंत बॉम्ब आणि इतर काही बॉम्बचे अवशेष जप्त केले आहेत. तसेच, बॉम्ब बनवण्यासाठी लागणारे कच्चे साहित्यही सापडले आहे. सुरक्षा यंत्रणा या साहित्याच्या आधारे बॉम्ब बनवणारा आणि त्यामागील उद्देश शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. पुढील तपासात CCTV फुटेज तपासणे, मुख्य संशयिताचा शोध घेणे आणि NIA कडून अहवाल येणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत.
