विमानातील सुरक्षेच्या कारणास्तव DGCA ने MOBIKINS MK-PB-04 या मॉडेलच्या पॉवर बँकेवर भारतात बंदी घातली आहे. ११ ऑक्टोबर २०२६ रोजी एका IndiGo फ्लाईटमध्ये या पॉवर बँकेमुळे आग लागल्याची घटना घडली होती, त्यानंतर हा कठोर निर्णय घेण्यात आला.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (DGCA) MOBIKINS MK-PB-04 या पॉवर बँक मॉडेलच्या वाहतुकीवर तात्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. ही बंदी भारताच्या सर्व देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान सेवांसाठी लागू असेल. हे डिव्हाइस आता केबिन बॅगेज, चेक-इन बॅगेज किंवा कार्गोमध्येही नेण्यास सक्त मनाई आहे.
नक्की काय घडले होते?
११ ऑक्टोबर २०२६ रोजी दिल्लीहून चेन्नईला जाणाऱ्या IndiGo च्या ६E ६११५ फ्लाईटमध्ये एका प्रवाशाची हीच पॉवर बँक ओव्हरहेड बिनमध्ये पेटली होती. आगीची तीव्रता पाहून विमानाचे हैदराबादला आपत्कालीन लँडिंग (Emergency Landing) करावे लागले होते. सुदैवाने, या घटनेत कोणीही गंभीर जखमी झाले नाही, परंतु यामुळे विमान प्रवासातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला होता.
एअरलाईन्स आणि प्रवाशांसाठी सूचना
या निर्णयानंतर एअरलाईन्सच्या ग्राउंड स्टाफ आणि सुरक्षा यंत्रणांवर आता या विशिष्ट पॉवर बँक्स शोधण्याची मोठी जबाबदारी आली आहे. विमानतळावर प्री-फ्लाईट स्क्रीनिंग दरम्यान ही पॉवर बँक आढळल्यास ती जप्त केली जाईल. लिथियम-आयन बॅटरीमध्ये 'थर्मल रनवे' (Thermal Runaway) सारख्या तांत्रिक बिघाडामुळे अचानक आग लागण्याचा धोका असतो. म्हणूनच, प्रवाशांनी आपल्याकडील गॅझेट्सची सुरक्षा तपासणे अत्यंत गरजेचे झाले आहे. एअरलाईन्सना आता प्रवाशांना या बंदीबद्दल सतर्क करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
