म्युचुअल फंडच्या रिपोर्ट कार्डमध्ये चांगले रिटर्न्स दिसतात, पण प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या हातात मात्र कमी नफा येतो. यालाच 'बिहेविअर गॅप' म्हणतात, जो चुकीच्या वेळी एंट्री आणि एक्झिट केल्यामुळे निर्माण होतो.
पर्सनल फायनान्समध्ये एक मोठी समस्या म्हणजे फंड हाऊसचे पब्लिश झालेले रिटर्न्स आणि गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात जमा होणारा प्रत्यक्ष पैसा यात असलेली दरी. फंड मॅनेजरच्या कामगिरीपेक्षा गुंतवणूकदारांची मानसिकता (Psychology) याला जास्त कारणीभूत असते.
मार्केट टाइमिंगचा फटका
या गॅपचे सर्वात मोठे कारण म्हणजे 'रिसन्सी बायस' (Recency Bias), म्हणजेच जे क्षेत्र सध्या तेजीत आहे, तिथेच धाव घेणे. उदाहरणार्थ, २००७-०८ मधील इन्फ्रास्ट्रक्चर तेजीत अनेक गुंतवणूकदारांनी पीक लेव्हलला पैसे गुंतवले. त्या फंडने ३३.८% वार्षिक रिटर्न्स दिले असले, तरी उशिरा आलेल्या गुंतवणूकदारांना केवळ ६.२% परतावा मिळाला. अगदी टेक फंड्समध्येही असेच घडते, जिथे १७% सीएजीआर (CAGR) असला तरी प्रत्यक्ष गुंतवणूकदारांना फक्त ७% नफा मिळतो, कारण बाजारात चढ-उतार होताच ते पैनिक सेलिंग करतात.
SIP असूनही भीती का वाटते?
अनेकांना वाटते की SIP म्हणजे मार्केटच्या धोक्यांपासून सुरक्षित कवच आहे. पण जसजसा तुमचा पोर्टफोलिओ मोठा होतो, तसतसा १०% करेक्शनही मोठी रक्कम वाटते. यामुळे भीतीपोटी अनेकजण SIP बंद करतात किंवा गुंतवणूक काढून घेतात. कंपाउंडिंगचा फायदा मिळवण्यासाठी चढ-उताराच्या काळातही टिकून राहणे गरजेचे असते.
दरी कशी भरून काढाल?
तज्ज्ञांच्या मते, 'बकेट स्ट्रॅटेजी' वापरा. आपत्कालीन परिस्थितीसाठी लिक्विड कॅश, अल्पकालीन ध्येयांसाठी डेट आणि दीर्घकालीन संपत्तीसाठी इक्विटी असे विभाग करा. जेव्हा तुमच्याकडे सुरक्षित पैसे उपलब्ध असतात, तेव्हा बाजारात पडझड झाली तरी तुम्हाला शेअर्स विकण्याची गरज पडत नाही. २-३ वर्षांच्या शॉर्ट-टर्मच्या आधारावर निर्णय घेण्याऐवजी ५ ते १० वर्षांच्या कालावधीचा विचार करा.
