AI क्षेत्रातील दिग्गज कंपनी Anthropic लवकरच शेअर बाजारात एन्ट्री करण्याच्या तयारीत आहे. याआधी कंपनीने एका नव्या शेअर स्ट्रक्चरची घोषणा केली असून, याद्वारे सात सह-संस्थापकांना ५०.१ टक्के वोटिंग राईट्स (Voting Control) मिळणार आहेत.
काय आहे नेमकी योजना?
आर्टिफिशियल इंटेलिजन्स क्षेत्रात क्रांती घडवणारी कंपनी Anthropic आता आपल्या शेअर स्ट्रक्चरमध्ये मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सादर केलेल्या प्रस्तावानुसार, त्यांच्या सातही सह-संस्थापकांना (Co-founders) कंपनीच्या महत्त्वाच्या निर्णयांवर ५०.१% वोटिंग पॉवर मिळणार आहे. या अधिकार टिकवून ठेवण्यासाठी सातपैकी किमान तीन संस्थापकांना कंपनीत ठराविक प्रमाणात इक्विटी भागभांडवल राखणे बंधनकारक असेल.
संस्थापकांचा हेतू काय?
या निर्णयामागे एक सामाजिक उद्देश आहे. कंपनीचे सीईओ डॅरियो अमोडी आणि इतर संस्थापकांनी आपली ८०% वैयक्तिक संपत्ती दान करण्याचा संकल्प केला आहे. जर त्यांनी सामान्य पद्धतीने शेअर्स दान केले असते, तर त्यांचे कंपनीवरील नियंत्रण कमी झाले असते. हे टाळण्यासाठी त्यांनी वोटिंग पॉवर आणि आर्थिक मालकी वेगळी करण्याचा मार्ग निवडला आहे.
गुंतवणुकदारांसाठी काय परिणाम होतील?
या स्ट्रक्चरमुळे भविष्यातील रिटेल गुंतवणूकदारांच्या हातात कंपनीचे धोरणात्मक निर्णय घेण्याची ताकद मर्यादित राहू शकते. जरी Meta किंवा Snap सारख्या कंपन्यांमध्येही 'ड्युअल-क्लास' स्ट्रक्चर आहे, तरीही Anthropic चे मॉडेल सात संस्थापकांवर आधारित असल्याने ते थोडे वेगळे आहे.
कंपनीने हेही स्पष्ट केले आहे की, 'लॉन्ग-टर्म बेनिफिट ट्रस्ट' बोर्डाच्या बहुतांश सदस्यांची नियुक्ती करणे सुरू ठेवेल. सध्या सेकंडरी मार्केटमध्ये कंपनीचे व्हॅल्युएशन मोठ्या प्रमाणात वाढले आहे, मात्र या नव्या governance मॉडेलकडे संस्थात्मक गुंतवणूकदार कसे पाहतात, हे आगामी काळात महत्त्वाचे ठरेल.
