सध्या सायबर गुन्हेगार UPI युजर्सना 'फेक रिफंड'च्या नावाखाली गंडा घालत आहेत. अनोळखी व्यक्तीकडून चुकून पैसे आल्याचे सांगून, फसवणुकीचे QR कोड स्कॅन करायला लावून किंवा UPI पिन टाकण्यास भाग पाडून तुमच्या खात्यातील पैसे लंपास केले जात आहेत.
फसवणूक कशी केली जाते?
हा स्कॅम अत्यंत हुशारीने रचला जातो. सुरुवातीला फसवणूक करणारे तुमच्या खात्यावर काही रक्कम पाठवतात आणि त्यानंतर तुम्हाला फोन किंवा मेसेज करून ती रक्कम 'चुकून' गेल्याचे भासवतात. भावनिक दबाव निर्माण करून ते तुम्हाला एक 'रिफंड' QR कोड पाठवतात. जेव्हा तुम्ही हा कोड स्कॅन करून UPI पिन टाकता, तेव्हा प्रत्यक्षात ते रिफंड नसून तुमच्या खात्यातून पैसे डेबिट करण्याची (Collect Request) प्रक्रिया असते. लक्षात ठेवा, पैसे मिळवण्यासाठी कधीही पिनची गरज नसते.
बँकेचा आणि तज्ज्ञांचा सल्ला
जर तुमच्या खात्यात अचानक पैसे जमा झाले, तर अनोळखी व्यक्तीशी थेट संवाद टाळा. तुमच्या अधिकृत बँक ॲपद्वारे किंवा स्टेटमेंटद्वारे व्यवहाराची खात्री करा. जर पैसे चुकून आले असतील, तर बँक कस्टमर केअरशी संपर्क साधावा. अधिकृत बँकेमार्फतच 'रिव्हर्सल' प्रक्रिया करणे सुरक्षित असते, ज्यामुळे तुमच्या व्यवहाराची नोंद राहते आणि फसवणुकीचा धोका टळतो.
फसवणूक झाल्यास काय करावे?
जर तुम्ही या स्कॅमला बळी पडला असाल, तर घाबरून न जाता तात्काळ 1930 या सायबर क्राईम हेल्पलाइनवर फोन करा. तसेच cybercrime.gov.in या पोर्टलवर तक्रार नोंदवा. त्वरित आपल्या बँकेशी संपर्क साधून खाते गोठवा (Freeze), जेणेकरून पुढील होणारी फसवणूक टाळता येईल.
