चुकीच्या UPI ID वर पैसे पाठवणे ही एक सामान्य चूक आहे, पण ते परत मिळवणे आव्हानात्मक असते. तुमचा UPI PIN टाकून तुम्ही व्यवहार अधिकृत करत असल्याने बँक आपोआप पैसे रिफंड करू शकत नाही. अशा वेळी पेमेंट ॲप आणि बँकेला तातडीने तक्रार करणे हाच सर्वोत्तम मार्ग आहे.
भारतातील डिजिटल पेमेंटमध्ये UPI क्रांती झाली असली, तरी अनेकदा घाईत आपण चुकीच्या UPI ID वर किंवा चुकीच्या मोबाईल नंबरवर पैसे पाठवतो. लक्षात ठेवा, प्रत्येक UPI व्यवहार तुम्ही स्वतःच्या PIN ने अधिकृत (Authorize) करत असता, त्यामुळे बँक ते व्यवहार आपोआप रद्द (Reverse) करू शकत नाही.
पैसे चुकल्यावर काय करावे?
१. स्टेटस तपासा: सर्वात आधी Google Pay, PhonePe किंवा Paytm सारख्या ज्या ॲपवरून पैसे पाठवले, तिथे व्यवहार पेंडिंग (Pending) आहे का ते तपासा. जर तो पेंडिंग असेल, तर पैसे परत येण्याची शक्यता असते.
२. तक्रार नोंदवा: व्यवहार यशस्वी झाला असेल, तर लगेच पेमेंट ॲपच्या 'Help' किंवा 'Support' विभागात जाऊन तक्रार (Dispute) नोंदवा. तुमच्याकडे ट्रान्झॅक्शन आयडी (Transaction ID) आणि तारीख असणे आवश्यक आहे.
३. बँकेशी संपर्क साधा: तातडीने तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला माहिती द्या. बँक थेट समोरच्याच्या खात्यातून पैसे कापू शकत नाही, पण तक्रार नोंदवल्याने एक अधिकृत रेकॉर्ड तयार होते. गरज पडल्यास तुम्ही NPCI च्या तक्रार पोर्टलवर किंवा Reserve Bank of India च्या ओम्बड्समनकडे दाद मागू शकता.
४. साइबर क्राईम हेल्पलाइन: जर तुम्हाला फसवणुकीचा संशय असेल, तर त्वरित 1930 या नॅशनल सायबर क्राईम हेल्पलाइन नंबरवर कॉल करा.
सावध राहा - रिकव्हरी स्कॅमपासून दूर राहा!
पैसे परत मिळवून देण्याच्या नावाखाली अनेक ठग तुम्हाला फोन करू शकतात. लक्षात ठेवा, कोणताही अधिकृत बँक अधिकारी तुमचा PIN किंवा OTP मागत नाही. कोणीही पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवून लिंक पाठवत असेल, तर त्यावर क्लिक करू नका. पैसे पाठवण्यापूर्वी नेहमी समोरच्या व्यक्तीचे नाव तपासा, हीच सुरक्षिततेची पहिली पायरी आहे.
