वयाची **70 वर्षे** पूर्ण झाल्यामुळे नोएल टाटा येत्या **12 नोव्हेंबरला** टाटा ग्रुपच्या सहा मोठ्या कंपन्यांच्या संचालक मंडळाचा राजीनामा देणार आहेत. या बदलादरम्यानच टाटा सन्सच्या अध्यक्षपदाच्या पुनर्नियुक्तीवरून ग्रुपमध्ये अंतर्गत मतभेद समोर आले आहेत.
टाटा ट्रस्टचे अध्यक्ष नोएल टाटा येत्या 12 नोव्हेंबर रोजी टाटा समूहातील सहा प्रमुख कंपन्यांच्या संचालक पदावरून पायउतार होणार आहेत. यामध्ये Trent, Voltas, Tata Steel, Titan, Tata International आणि Tata Investment Corporation या कंपन्यांचा समावेश आहे. समूहाच्या धोरणानुसार, 70 वर्षे वय पूर्ण करणाऱ्या नॉन-एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्सना निवृत्त होणे अनिवार्य आहे.
नेतृत्वाचा वाद आणि गव्हर्नन्स
या निवृत्तीनंतरही नोएल टाटा 'टाटा सन्स'च्या बोर्डवर नॉमिनी डायरेक्टर म्हणून कायम राहतील. मात्र, सध्या सगळी चर्चा ही एन. चंद्रशेखरन यांच्या फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणाऱ्या ५ वर्षांच्या कार्यकाळाच्या विस्तारावर आहे. नोएल टाटा यांनी 26 ऑक्टोबर रोजी या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. 17 सप्टेंबर रोजी झालेल्या बोर्ड मिटिंगमध्ये चंद्रशेखरन यांच्या नियुक्तीला ट्रस्ट-नामांकित संचालकांचा बहुमताने पाठिंबा होता का, याची विचारणा नोएल टाटा यांनी केली आहे. यासाठी त्यांनी मिटिंगचे मिनिट्स आणि रेकॉर्ड्सची मागणी केली आहे.
गुंतवणूकदारांसाठी काय आहेत संकेत?
टाटा सन्समध्ये 66% हिस्सा टाटा ट्रस्टकडे आहे. सध्या चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वाखाली समूह सेमीकंडक्टर, एव्हिएशन आणि बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगसारख्या मोठ्या प्रकल्पांवर काम करत आहे. मात्र, ट्रस्ट आणि टाटा सन्सच्या ऑपरेशनल नेतृत्वातील हे मतभेद भविष्यातील धोरणात्मक निर्णयांवर परिणाम करू शकतात. हे प्रकरण टाटा सन्ससारख्या अप्पर-लेयर NBFC साठी कळीचे ठरले असून, गुंतवणूकदार आता या वादाच्या निकालाकडे डोळे लावून बसले आहेत.
