पश्चिम आशियामध्ये इराण, अमेरिका आणि इस्त्रायल यांच्यातील तणाव शिगेला पोहोचला आहे.
या पार्श्वभूमीवर, अनेक जागतिक बँका आणि सल्लागार कंपन्यांनी आपल्या पश्चिम आशियातील शाखा तात्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. इराणच्या लष्करी कमांडने (Khatam Al-Anbiya) दिलेल्या इशाऱ्यानंतर, इस्त्रायल आणि अमेरिकेशी संबंधित आर्थिक आणि बँकिंग पायाभूत सुविधांवर प्रतिहल्ला होण्याची भीती निर्माण झाली आहे.
या धोक्याची दखल घेत, सिटीबँकने (Citigroup) आपल्या दुबईतील सर्व कार्यालयांमधून कर्मचाऱ्यांना तात्काळ बाहेर पडण्याचे आणि घरून काम करण्याचे निर्देश दिले आहेत. यात दुबई इंटरनॅशनल फायनान्शियल सेंटर (DIFC) आणि औद मेहता येथील कार्यालयांचा समावेश आहे. कर्मचाऱ्यांची सुरक्षा आणि व्यवसायाचे सातत्य राखणे याला प्राधान्य असल्याचे बँकेने म्हटले आहे.
ब्रिटिश बँक स्टँडर्ड चार्टर्डने (Standard Chartered) देखील संयुक्त अरब अमिरातीमधील (UAE) आपल्या कर्मचाऱ्यांसाठी अशाच सुरक्षा उपाययोजना केल्या आहेत, मात्र त्यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला आहे. दुसरीकडे, एचएसबीसी (HSBC) बँकेने कतारमधील आपल्या सर्व शाखा पुढील सूचनेपर्यंत बंद ठेवल्या आहेत, जेणेकरून कर्मचारी आणि ग्राहकांचे संरक्षण करता येईल. दुबई हे JPMorgan सारख्या अनेक जागतिक वित्तीय संस्थांसाठी एक महत्त्वाचे केंद्र आहे.
सुरक्षेची ही चिंता केवळ बँकांपुरती मर्यादित राहिली नाही, तर व्यावसायिक सेवा क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही यात सामील झाल्या आहेत. पीडब्ल्यूसी (PwC) आणि डेलॉईट (Deloitte) सारख्या प्रमुख सल्लागार कंपन्यांनी वाढत्या तणावामुळे दुबईतील आपली कार्यालये रिकामी केली आहेत. पीडब्ल्यूसीने खबरदारीचा उपाय म्हणून, या आठवड्यासाठी सौदी अरेबिया, कतार, यूएई आणि कुवेत येथील आपली सर्व कार्यालये बंद ठेवली आहेत. डेलॉईटनेही आपल्या कर्मचाऱ्यांन DIFC मधील कार्यालये सोडण्याचे निर्देश दिले आहेत. DIFC मधील इतर अनेक कंपन्याही आपल्या कर्मचाऱ्यांसाठी आणि कामकाजासाठी अशाच प्रकारच्या व्यवस्था करत असल्याचे वृत्त आहे.
या कंपन्यांच्या बाहेर पडण्याचा ट्रेंड तंत्रज्ञान कंपन्यांमध्येही दिसून येत आहे. मेटा (Meta), गुगल (Google), ॲमेझॉन (Amazon) आणि एनव्हिडिया (Nvidia) सारख्या टेक जायंट्सनी देखील मध्य पूर्व (Middle East) मधील आपली कार्यालये बंद केली आहेत. यामुळे दुबई, इस्त्रायल, कुवेत, बहरीन आणि तुर्की यांसारख्या देशांतील कामकाजावर परिणाम झाला आहे. या व्यापक कॉर्पोरेट हालचालींमुळे प्रादेशिक स्थिरतेबद्दल आणि संभाव्य व्यावसायिक व्यत्ययांबद्दल मोठी चिंता व्यक्त होत आहे.