अर्थ मंत्रालयाने आता एक्झेम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड (PF) ट्रस्टना जागतिक स्तरावरील चार मोठ्या बँकांच्या रुपया-डिनॉमिनेटेड बाँड्समध्ये गुंतवणूक करण्याची परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे ३० लाख कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निधीला आता देशांतर्गत बाजाराव्यतिरिक्त गुंतवणुकीचे नवे पर्याय मिळणार आहेत.
वित्त मंत्रालयाने एक्झेम्प्टेड प्रॉव्हिडंट फंड (PF) ट्रस्टसाठी गुंतवणूक मार्गदर्शक तत्त्वांमध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत. EPF आणि MP ॲक्ट, १९५२ च्या कलम १७ अंतर्गत काम करणारे हे ट्रस्ट आता चार आंतरराष्ट्रीय संस्थांकडून जारी केलेल्या रुपया-डिनॉमिनेटेड बाँड्समध्ये गुंतवणूक करू शकतील. यामध्ये IBRD, IFC, आशियाई विकास बँक (ADB) आणि न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) यांसारख्या संस्थांचा समावेश आहे.
गुंतवणुकीची नवी कक्षा
आतापर्यंत हे ट्रस्ट प्रामुख्याने देशांतर्गत कॉर्पोरेट डेट मार्केटवर अवलंबून होते. यामुळे त्यांचे रिटर्न्स स्थानिक कंपन्यांच्या कामगिरीशी बांधले गेलेले होते. आता जागतिक स्तरावरील संस्थांच्या बाँड्समध्ये गुंतवणूक करण्याची मुभा मिळाल्याने पोर्टफोलिओमध्ये विविधता येण्यास मदत होईल. या बाँड्सची खासियत म्हणजे ते रुपयामध्ये असल्याने ट्रस्टला करन्सी रिस्कचा धोका राहणार नाही.
गुंतवणुकीच्या सुरक्षिततेसाठी, या बाँड्सची मॅच्युरिटी किमान ३ वर्षे असणे अनिवार्य करण्यात आले आहे, जेणेकरून सट्टा (Speculative) व्यवहारांना आळा बसेल.
व्याजदरांवर नियंत्रण
गुंतवणुकीचे नवे पर्याय उपलब्ध करून दिले असले तरी, कर्मचाऱ्यांच्या बचतीला सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने नियमावली कडक ठेवली आहे. एक्झेम्प्टेड ट्रस्टना EPFO ने जाहीर केलेल्या वार्षिक व्याजदरापेक्षा २ टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर घोषित करता येणार नाही. या मर्यादेमुळे ट्रस्टवर आक्रमक गुंतवणूक करून अधिक रिटर्न्स मिळवण्याचा दबाव राहणार नाही आणि कर्मचाऱ्यांचे पैसे सुरक्षित राहतील.
